Thursday, September 19, 2013

स्वप्नातून जन्मले नवस्वप्न

           कालचे ते गारठलेले आणि आखडलेले पाय आज सुन्न झालेत. खान्द्यापासून प्रत्येक बोटाच्या नखापर्यंत हात पुर्ण दुखत आहेत. तळहाताची मुठ अवळण्याचा प्रयत्न जरी केला तर अंगात एक शिरशिरी येते आणि हाताचा प्रत्येक स्नायू , "नाही, नाही" म्हणून ओरड सुरु करतो. दोरखंडाचे कमरेवर पडलेले व्रण अजूनही बोचत अहेत.डोळ्यांमध्ये काल उधार असलेली झोप सारखी खुणावते आहे. हि फलनिष्पत्ती आहे, एका छोट्याश्या स्वप्नाची जे पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत बघितलं होत.

          तीन वर्षांआधी मित्रांबरोबर मिरवणूकित खूप धमाल करत होतो. लक्ष्मी रोडवर, ढोल-ताशा आणि टोलाची ती युती थिरकायला भाग पाडते. मनमुराद थिरकलो. सुरुवातीला खूप समाधानाने नाचत होतो पण जशीजशी मिरवणूक पुढे सरकत होती तसतसं एक असमाधान वाटायला सुरुवात झाली. त्याच कारण होती पथकातली ती तरुणाई जी वाघाच्या आवेषाने ढोल बडवत होती. त्यात मग तरुण पोर होती, तरुणीसुद्धा त्याच ताकदीने त्यांना आव्हान देत होत्या. आणि एवढच काय, पण १२-१३ वर्षांची मुलंसुद्धा त्याचं वय मागे टाकीत होती. कशासाठी ते ढोल बडवतात, काय मिळत त्यांना, हि मुलं नाचण्याच सोडून ढोल कशाला बडवतात… एक ना अनेक प्रश्न मनात आले. मग हळूहळू उत्तरं मिळू लागली, कदाचित ढोल-ताशा वाजवण्यात जास्त आनंद असेल, प्रेक्षकांना थिराकावण्यात काही वेगळी मजा असेल, मला घेता येईल का तो अनुभव? आणि  त्याचवेळी हळुवारपणे एका स्वप्नाने मनात प्रवेश केला.एक दिवस हे सगळ अनुभवायचं, लक्ष्मी रोडवर ढोल-ताशांच्या गजरात सामील व्हायचं. मग सुरु झाली शोधाशोध. पूर्ण माहिती मिळाल्यावर एक गोष्ट लक्षात आली, सगळ काही करू शकतो पण यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो काढण फार कठीण. ईछा खूप नशीब साथ देत न्हवत. पण यावर्षी ते योगसुद्धा जुळून आले, गणपतीच्या काळात resource pool ने साथ दिली.

         जुलै महिन्यापासून विसर्जनाचे पडघम नदी किनारी ऐकू येऊ लागले. मनामध्ये पुन्हा उभारी आली पण तरीही एक काही ठरत न्हवत. सहजम्हणून राजाराम ब्रिजजवळच्या एका पथकात त्याचं वादन ऐकण्यासाठी गेलो. ढोल-ताशांच्या त्या निनादाने माझं मन एका झटक्यात पक्क केलं. त्यांनीही मला लगेच प्रवेश दिला आणि माझी सुरुवात झाली. पथकाच नाव 'शिवसाम्राज्य'. रोज ऑफिसमधून संध्याकाळी सहालाच निघायचं आणि पथकामध्ये एक-दीड तास सराव करायचा. पथकात तरुण जरी जास्त असले तरी लहान आणि वयस्कर पण होते. जवळ जवळ नव्वद टक्के लोकं शाळा-कॉलेजात जात होती त्यामुळे त्यांची style बरीच जुळायची, स्पाईक कट, beard style आणि प्रत्येकाच्या कानात मोत्याचं डूल.

          खूप शिस्तीमध्ये वादन होई रोज. या शिस्तीच श्रेय पूर्णपणे अक्षय दादाला जाईल. एखाद्या corporate प्रोजेक्ट मध्ये असते तेवढी शिस्त त्यांनी पथकात ठेवलेली.सरावाच्या शेवटी एक छोटीशी stand up मीटिंग घेऊन तो सगळ्यांना सूचना देत असे. खूप लहान सहान गोष्टींपासून मोठ्या शंकांपर्यंत तो रोज सांगत असे. ढोल-ताशानंतर पथकातली सगळ्यात जास्त impressive वाटलेली गोष्ट म्हणजे हि अक्षय दादाची शिस्त. इतक्या सगळ्या लोकांना संभाळण फार कठीण पण यात त्यांना राकेशसर आणि केदार सर यांनी त्यांना पुरेपूर मदत केली. यांच्या एवढाच महत्वाचा माणूस म्हणजे सनी, अक्षय दादांचा लहान भाऊ. नवीन लोकांना शिकवण, ढोल आवळण, पथकाचे calls हाताळण, सगळ्यांपर्यंत message पोचवण इथपासून ते लक्ष्मी रोडची अक्खी मिरवणूक लढवण हे सगळ त्याने केलं. नवव्या दिवशी रात्रीची मिरवणूक संपवून त्याने सासवडला जाऊन ढोलाची पानं आणलेली आणि एवढंच नाही तर दुसऱया दिवशी टिळक रोड, लक्ष्मी रोड दोघंही ठिकाणी त्याने वादन केल.यानंतर महत्वाची ती प्रत्यक्ष कृती करणारे माणसं, भारत, रवि, ओंकार, कुमार, भानू , गौरव, अभिजीत आणि मुलींमध्ये अमिता. यांना बघून बघूनच तर आम्ही शिकलो. भारतचा stamina तर संपतच नाही आणि रवि तर नेहमी हसत, वेगवेगळ्या dance steps करत वादन करतो. चपातीवरच्या त्याच्या steps नंतर पूर्ण ग्रुपनेच आत्मसात केल्या.  कुमार आणि भानू तर हत्तीच्या ताकदीने ढोल बडवतात आणि त्यांनी आवळलेल्या ढोलावर तर ताशाही ही वाजेल इतका तो घट्ट असतो. अमिता मुलींच पथक सांभाळत असे. मला पहिल्यादिवशी तिनेच training दिली होती. तीसुद्धा stamina च्या बाबतीत अजिबात कमी नाही. तीन तास तर ती आरामात काढू शकते. ताशांमध्ये ओंकार सगळ हाताळत असे. १८-२० वर्षाचा मुलगा, दात दाबून, ढोलान्ना आणि ताशांना बरोबर घेऊन ताल पुढे नेतो. सगळ्यांशी व्यवस्थित बोलणार, व्यवस्थित रहाणार आणि अहंकार नाही किंवा गर्व नाही कशाचा. ओंकार जसा महत्वाचा तसाच लहानगा नानू , मध्यम वयाचा पंकज, भजन करणारे अप्पा, भावड्या, किरण आणि अजस्त्र इंदर हि मंडळीही भारी ताशा वाजवतात. ढोलान्मधले  सिद्धार्थ, अक्षय, आकाश , पियुष-नीरज हि मुलही प्रशंसनीय वाजवतात. त्यात पियुष-नीरज यांच्या मैत्रीचे किस्सेही भारीच. सगळ्यात मिळून मिसळून राहणारी मुलं दोघ. लहान पण तसेच; मानस आणि पियुष मोठ्यांनाही चाट पडतील इतक छान बडवतात. अशी हि शंभर पेक्षा जास्त लोकांची team दोन महिन्यात तयार झाली.

          महासंघाच्या world record आणि सकाळच्या स्पर्धेनंतर पथकाची प्रतिमा जगासमोर येऊ लागली. सगळ्यांना थोडीशी भीती तर होतीच त्यामुळे पथकाचा कमीत कमी नाव तरी खराब करू नका अशी काळजीवजा सूचना दादाने सकाळच्या स्पर्धेपूर्वी दिलेली.  पण नंतर झाल वेगळच, मुलांनी तर थेट अंतिम फेरीच गाठली. यामुळे सगळ्यांमध्ये नवीन जोश संचारला आणि दोन वर्षाचं हे पथक दोन महिन्यातच तरुण झालं. आपणही इतरांना जोरदार टक्कर देऊ शकतो हा आत्मविश्वास पथकाला आला.

           गणपतीचा पहिला, पाचवा, सातवा, नववा दिवस पथकाने गाजवला खरा पण तरीही काहीतरी कमी वाटत होत. दहाव्या दिवशी टिळक रोडला हत्ती गणपतीसमोर वादन झाल. नावाजलेला गणपती असल्याने बरीच public होती. तिथंही आमचं वादन साजेसंच झालं. पण पावसाने या उत्साहावर विरजण घालायला सुरुवात केली. कसेबसे आम्ही आमचे ढोल वाचवले. जेवण झालेलं नाही, कालपासून वादन सुरु असल्याने मुल थकलेली आणि त्यात असा पाऊस पथकाच आर्थिक नुकसान पण करणारच. त्यामुळे या अशा पावसात मिरवणूक वाजवायची कि नाही हा दादापुढे मोठा प्रश्न होता. पण मुलांना तर मिरवणूक हवीच होती. या अशा प्रसंगीही मुलांनी 'सोनु तुला सोन्याची माळ घे…' गाऊन स्वताबरोबर बाकीच्या पथकांचही मनोरंजन केल. उत्साह तसूभरही कमी न्हवता. त्यामुळे 'नाही' हा शब्द कुणाच्या ध्यानीमनीही न्हवता. त्यात बाजूला असलेल्या शिवशक्ती पथकातून दादाला एक आशादायी सल्ला मिळाला, "ढोलांचा कसला विचार करताहेत, आपण याच तर दिवसासाठी दोन-दोन महिने सराव करून घेतला आहे, वाजवा मिरवणूक…" आणि ठरलं मग आता पुढचा टप्पा, लक्ष्मी रोड. स्वप्नपूर्तीची वेळ जवळ आली होती.

          दगडूशेठच्या बाजूला असलेल्या वीर हनुमान मंडळासाठी आमचं वादन होत. पोलिसांच्या घाई-गर्दीत आम्ही ढोल बांधले. नेहमीप्रमाणे राजा शिवछत्रपतिच्या गाण्याने आम्ही सुरुवात केली आणि पहिला हात घेत पुढे निघालो. लक्ष्मि रोडचा पहिला चौक, संध्याकाळी साडेसहाची वेळ, शेकडोंनी public जमलेलं. मावळी फेटा असल्याने लोकांच्या नजरा रोखून धरल्या गेल्या आमच्यावर. पुन्हा आम्ही 'राजा शिवछत्रपति' चा ताल पकडला . आणि  काही क्षणातच जल्लोष सुरु झाला. आमच्या तालावर public थिरकू लागली, जोशात आम्हाला प्रोत्साहित करू लागली . त्यांचा तो ऊत्साह पाहून आमचं वादनाचा आवेश वाढला आणि नविन बळ अंगात संचारलं. भीमरूपी, चपाती, गरबा, भांगडा, लावणी, we will rock u, रेल्वे, पाऊस यांमुळे  आमचं वेगळपण लक्षात आलं लोकांना. पुढच्या प्रत्येक चौकात हे चित्र जास्तच रंगू लागलं. शगुन चौकातल्या एक धोक्यानंतर तर मला माझं गर्वगीतच आठवलं, त्यातली कल्पना खरी ठरली होती; "भास घडवू रेल्वेचा अन वाजेल असा एक-ठोका। गगानालाही धाक दाखवूपाउस पाडू एवढा". ना पाऊस थांबण्याच नाव घेत होता आणि ना आम्ही! प्रत्येक ठोका ढोलावरचे तुषार उडवत होता. चार तास उलटले तरी कुणी ढोल सोडायला तयार न्हवत.  बेभान होऊन लोकं नाचलीत.कधी न्हवे ते इतक्या cameras नि आमची छबी टिपलेली. खूप आदराने, औत्सुक्याने लोक  आमच्याकडे बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेच प्रश्न मला दिसत होते जे मला तीन वर्षांपूर्वी पडले होते. आणि त्यांच्या चेहऱ्यांवर आपल्यामुळे पडणारे असे प्रश्न हेच उत्तर आहे माझ्या त्या सगळ्या प्रश्नांना. प्रेक्षकांकडून मिळणारी दाद, प्रतिसाद, त्यांच्या टाळ्या, त्यांना नाचायला लावण, त्यांना आनंद देण आणि त्याचं आपल्याला अभिवादन यातलं आनंद काल आम्ही अनुभवला. 'आपल्या वेडावर लोकांना वेड करणं' हि मिळकत खूप महत्वाची आहे. या सगळ्याच श्रेय आमच्या पूर्ण पथकाला जात. 'शिवसाम्राज्याची' नक्कीच यशस्वी होईल. परवापर्यंत फक्त तीन लोक पथकात असे होते कि ज्यांना लक्ष्मी रोडचा अनुभव होता आणि आज पक्षाकडे असे शंभराहून जास्त लोक आहेत. यावर्षी पथकाची ओळख निर्माण झालीय आणि पुढच्या काही वर्षात पुण्यातलं महत्वाचं पथक म्हणून नावारूपाला येईल.

          पथकामध्ये शिस्त आणि स्पर्धेची जेवढी चाड आहे तेवढंच सामंज्यस्य पण आहे. आम्ही खुन्नस देण्यासाठीपण तयार आहोत आणि दुसरया पथकाला मदत करायलाही आम्ही पुढे असतो. यातलाच एक प्रसंग म्हणजे काल परशुराम पथकाची झालेली कोंडी. गोऱ्या गोऱ्या आणि साध्या लोकांच हे नवीन पथक लक्ष्मी रोडवर अडकलं. एकीकडे पथकांची रांग सुरु तर दुसरीकडे भरगच्च गर्दी. सोबत ७-८ मुली. कुठून जाव कसं जावं त्यांना कळत न्हवत. आमचं पथक त्यांच्या बाजूने जात असतांना प्रेक्षकानमध्ये एकच लोटालाटी सुरु झाली. साहजिकच परशुरामच्या मुली घाबरल्या आणि त्या मुलांना काय करावं समजेना. त्यावेळी आमच पथक धावून गेलं त्यांच्या मदतीला. अक्षय दादाने क्षणाचाही विलंब न करता त्यांना आमच्या पथकात घेण्याची सूचना केली. आणि काही क्षणात आमच्या मुलांनी त्यांना गर्दीतून बाहेर काढलं. आम्ही त्यांना मग रस्ता करून दिला. त्यांच्यावरच संकट खरंच आमच्या पोरांनी दूर केलं. त्यांनीही खूप आभार मानले.एकीकडे पथकात येणाऱ्या टवाळखोर लोकांना राकेश आणि इंदर कुटत होते तर त्याचवेळी महिला आणि लहान मुलांनाही आम्ही वाट करून दिलेली.

          काही वेळा आपण एक गोष्ट पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट घेतो आणि ती पूर्ण होत आल्यावर समजत कि आपण ज्याला अंत समजत होतो ती दुसऱ्या एका गोष्टीची सुरुवात आहे. असंच काही या बाबतीत झालंय. एकदा तरी लक्ष्मी रोडला वाजवायचं असं स्वप्न होत पण या स्वप्नाच्या  अंतातूनच एक नवीन स्वप्नाने जन्म घेतला, आता पुढंच लक्ष दगडूशेठची मिरवणूक, बस एकदा तरी ती मिरवणूक गाजवायची!

Tuesday, September 3, 2013

गर्वगीत


शिवबाचे सैनिक सारे, वेध आम्हाला गणरायाचे। 
जिंकुन जाऊ रणांगन, घेउन आयुध ढोल-ताशांचे॥ 

ढम-ढम आमच्या ढोलांची अन तड-तड आमच्या ताशांची। 
धरनिचेही पाय थिरकतिल, ऐकुन गर्जना वाद्यांची॥ 

भास घडवू रेल्वेचा अन वाजेल असा एक-ठोका। 
गगानालाही धाक दाखवूपाउस पाडू एवढा॥ 

रॉकही बडवू आम्ही, बरसात सोळ थाप्यांची। 
भुलुन जाइल दुनिया सारीसाथ मिळेल जेव्हा गरब्याची॥ 

कसब जाणिले पाच हातांचे, त्याला चपातिचि तलवार। 
जोशिल्या भिमरुपिला चढेल शिवाघोषाची धार॥ 

बळ मिळाले अश्वांचे अन चढविले कातडे वाघांचे। 
दुमदुमुन जाइल आसमंत जेव्हा स्फ़ुरतिल बाहू  सिंहांचे॥ 

आशीष भवानीचा आम्हाला, गाजवू मनांवर अधिराज्य। 

होईल जयघोष एकच, शिवसाम्राज्य-शिवसाम्राज्य||